Antilia Case: देशातील सर्वांत मोठे व्यापारी मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर धमकी पत्रासह जिलिटिनने भरलेली स्कॉर्पियो गाडी पार्क करण्यात आली होती. या प्रकरणाने पुढे जाऊन अनेक नवी वळणं घेतली. पण सुरुवातीला ही स्कॉर्पिओ सापडली असताना बॉम्ब शोध आणि निकामी पथकाकडून या गाडीची तपासणी सुरु असताना सचिन वाझे या तपासात अडथळा निर्माण करत असल्याचं ATS च्या रिपोर्टमधून समोर आलं आहे.
महाराष्ट्र ATS च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ''जेव्हा आम्हाला संबधित गाडीबद्दल माहिती पडलं आणि आम्ही तिचा तपास करत होतो, तेव्हा 3 वाजून 50 मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचलो. ज्यानंतर 9 वाजेपर्यंत आम्ही तपासणी केली. पण आमच्या पोहोचण्याआधीच सचिन वाझे त्याठिकाणी पोहोचले होते. तसंच आमच्या तपासांत वारंवार हस्तक्षेप करत होते.
नागरिकांना गाडीपासून दूर होण्यास सांगितलं-अधिकारी
पुढे बोलताना संबधित अधिकारी म्हणाले, ''गाडीचा दरवाजा खोलताच त्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांना धमकावणारा मजकूर लिहिण्यात आला होता. आम्ही याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवलं. तसंच लगेचच नागरिकांना गाडीपासून दूर होण्यास सांगितलं. त्यानंतर त्यात जिलिटिनच्या काड्या मिळाल्याने आम्ही लगेचच आसपासच्या सर्वांना दूर होण्यास सांगितलं. बॉम्ब शोधक पथकातील व्यक्ती तपास करत असतानाही वारंवार वाझे गाडीजवळ जाऊन स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात टाकत होते. त्यामुळे आम्ही त्यांना असे करु नका असे बजावले.''
आमच्या कामात हस्तक्षेप करत होते वाझे- अधिकारी
संबधित अधिकाऱ्याने त्याच्या रिपोर्टमध्ये उल्लेख केला आहे की, 'या कारवाईदरम्यान आम्ही सर्वांना दूर उभे राहण्यास सांगितले. सर्वजण याच पालन करत होते, पण वाझे आमच्या कामात वारंवार हस्तक्षेप करत होते.' हा तोच रिपोर्ट आहे ज्याची कॉपी नुकतीच ATS ने चांदीवाल आयोगासमोर ठेवली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवेदनानंतर हा रिपोर्ट समोर ठेवण्यात आला आहे. देशमुख यांच्या रिपोर्टनुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच मागील मास्टरमाइंड आहेत, असं नमूद करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असतील तर घेऊ द्या, त्याचा उपयोग होणार नाही : संजय राऊत
- Mumbai: परमबीर सिंह वसूली प्रकरणात नवा खुलासा, सॉफ्टवेअरचा वापर करून छोटा शकीलचा आवाज काढला; सीआयडीची माहिती
- Antilia Case : सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते; परमबीर सिंह यांचा गंभीर आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha