मुंबई : मुंबईत बेस्ट बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. परंतु बस चालकाने प्रसंगवाधन दाखवत वेग कमी करुन बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली आणि सिग्नलला धडकून थांबली. सुदैवाने या घटनेत बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. तर बस चालकावर प्रकृतीही स्थिर आहे.


घाटकोपरवरुन टाटा पॉवर हाऊस, चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या 381 क्रमांकाच्या बसला आज सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी हा अपघात झाला आहे. चेंबूर पोलीस स्टेशनसमोर बसंत पार्क इथे हा अपघात झाला आहे.



बस चालक हरिदास पाटील यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर त्यांचा बसवरील ताबा सुटला. परंतु बसमधील प्रवाशांना सुरक्षेचा विचार करत त्यांनी प्रसंगावधान दाखवलं. बसचा वेग कमी करुन ती बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली आणि बसंत पार्कच्या सिग्नलला धडकून थांबली. सुदैवाने प्रवाशांमध्ये कोणालाही इजा झाली नाही.


या बसमध्ये एकूण नऊ प्रवासी होते, त्यापैकी एक जण पोलीस कर्मचारी होता. त्यांनीच पोलिसांची गाडी मागून चालक हरिदास पाटील यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.