मुंबई : देशात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात असून राज्यात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. तर, याचे कारण मुंबईत कोरोना काळातही मुंबईकर बेशिस्तपणे वागत साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 188 चं उल्लंघन करत आहेत. यामुळेच दररोज किमान सरासरी 222 मुंबईकरांवर कलम 188 नुसार कारवाई करण्यात येत आहे. तर सरासरी 100 पेक्षा जास्त मुंबईतील दुकानावंर कारवाई केली जात आहे. यामुळेच आता साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कडक करण्याबाबत मुंबई पोलीस विचार करत आहेत.


मुंबई तशी नेहमीच चर्चेचा विषय असते. सध्या मुंबई चर्चेत आहे ती कलम 188 नुसार करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे. कारण कलम 188 चे उल्लंघन सर्वात जास्त मुंबईत होत असल्याचं समोर आलं आहे. या महामारीच्या काळात मुंबईकर सर्रास कलम 188 चे उल्लंघन करत आहेत. हे लक्षात आल्याने मुंबई पोलिसांनी कारवाईचे प्रमाण वाढवले आहे. कारण कारवाई होतेय या भितीने तरी मुंबईकर कलम 188 चे उल्लंघन करणार नाहीत, पण झाले उलटे ऐकतील ते मुंबईकर कसले. दररोज सरासरी 222 मुंबईकर कलम 188 चे उल्लंघन करत आहेत.


कलम 188 म्हणजे साथीचे रोग प्रतिबंधक कायदा. कोरोनामुळे 20 मार्चपासून मुंबईत हा कायदा लागू करण्यात आला आहे.


- 20 मार्चपासून आतापर्यंत कलम 188 नुसार तब्बल 53 हजार 473 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे.


- तर, यापैकी 8 हजार 268 मुंबईकर फरार आहेत.


- तसेच 21 हजार 215 मुंबईकरांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.


- आणि 26 हजार 991 मुंबईकरांना अटक करुन जामिनावर सोडून देण्यात आलं आहे.


तर आपल्या चांगल्यासाठीच केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना काळ असल्याने कलम 188 लागू केला आहे, पण हे नियम कायदे पाळतंय कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, या कोरोना काळात कोरोना रुग्णांसंदर्भात कलम 188 चे उल्लंघन केल्या बद्दल 289 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याबद्दल 10 हजार 855 मुंबईकरांवर कारवाई केली गेली आहे. तसेच, मुंबईत तब्बल 248 हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. मास्क न वापरल्या बद्दल 7 हजार 338 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. कलम 188 चे उल्लंघन केल्या प्रकरणी 110 पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर विना परवाना वाहतूक करणाऱ्या 3 हजार 032 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे.


या करोना काळात मुंबईत सर्वात जास्त उत्तर विभागातील मुंबईकरांनी कलम 188 पायदळी तुडवलाय, कारण उत्तर विभागात तब्बल 10 हजार 355 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळेच आता कलम 188 मधील कडक तरतूदींनुसार गंभीर स्वरुपाची कारवाई करण्याच्या तयारीत मुंबई पोलीस आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो आता तरी सुधारा नाही तर दंडा सोबतच दीर्घकाळ जेलची हवा खावी लागेल.


महत्त्वाच्या बातम्या :