मुंबई : ऐन उन्हाळ्यात बेस्ट प्रशासनाने मुंबईतील वातानुकूलित बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. घटती प्रवासी संख्या, वाढता मेंटेनन्स खर्च पाहता बेस्टने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईची वातानुकूलित बस सेवा बंद होणार आहे

सोमवारपासून 260 वातानुकूलित बस सेवा बंद होतील. मुंबईतील 25 मार्गांवर वातानुकूलित बस धावतात. मुंबईत एकूण 266 वातानुकूलित बस आहेत. या बसने दररोज 18 ते 20 हजार प्रवासी प्रवास करतात. तर 216 पासधारक आहेत.

बेस्टकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत, तर दुसरीकडे एसी बसवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे, असं सांगत प्रशासनाने एसी बस बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ऐन उन्हाळ्यात घामाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

जे प्रवासी सर्वसाधारण बस किंवा ट्रेनचा प्रवास टाळतात, त्यांना सोमवारपासून अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ज्यांनी अगोदरच पास काढला आहे, त्यांना बेस्टच्या इतर बसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.