नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता.
याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून आता वॉरंट जारी करण्यात आलं आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे यांनी टोलनाक्या वरून केलेल्या भडकावू भाषणानंतर नवी मुंबईतील मनसेकडून वाशी टोलनाका फोडण्यात आला होता. 2014 साली फोडलेल्या टोलनाक्यामुळे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र याबाबत अनेक वेळा राज ठाकरे यांना पोलिसांनी समन्स देऊनही ते कोर्टात हजर न राहिल्याने अखेर कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट काढले आहे.
26 जानेवारी 2014 रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. टोलनाक्यावरून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घटवा असे विधान केले होते. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुढील काही वेळातच वाशी खाडी पुलावरील टोलनाक्यावर नवी मुंबईतील मनसेने कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळेसह एकूण 7 जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली असली तरी राज ठाकरे यांनी मात्र पोलिसांच्या नोटीसींना उत्तरे दिली नव्हती. वाशी पोलिसांकडून अनेक वेळा राज ठाकरे यांना समन्स धाडूनही ते न्यायालयासमोर हजर झाले नव्हते. ही बाब पोलिसांनी वाशी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर त्यांच्या विरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने राज ठाकरे यांना दिले आहेत.