कल्याण : तब्बल 200 वर्षांची परंपरा असलेल्या आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा अशी ख्याती असलेल्या मुरबाड तालुक्यातील म्हसा जत्रेला सुरुवात झाली आहे. या जत्रेला दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक भेट देतात.
नवीन वर्ष सुरू झालं, की ठाणे जिल्हावासियांना म्हशाच्या जत्रेचे वेध लागतात. दरवर्षी पौष पौर्णिमेला या जत्रेची सुरुवात होते. दोन आठवडे चालणाऱ्या या जत्रेला तब्बल 200 वर्षांची परंपरा असून दरवर्षी राज्यभरातून 20 ते 22 लाख भाविक या जत्रेला भेट देतात. म्हशाचं खांबलिंगेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून इथे दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
जत्रेतला बैलबाजार हे या जत्रेचं प्रमुख वैशिष्ट्य असून येथे 25 हजारांपासून ते अगदी 2 लाख रुपयांपर्यंतचे विविध प्रजातींचे बैल विक्रीसाठी आणले जातात. शिवाय बांबूच्या टोपल्या, झाडाच्या खोडापासून तयार केलेला उखळ, कोयते, कुदळ, विळे असं शेतीला उपयोगी पडणारं साहित्यही जत्रेत मिळतं. तर आकाश पाळणे, विविध खेळ यांच्यासह इथला घोंगडी बाजारही प्रसिद्ध आहे.
म्हशाच्या जत्रेत मिळणारे हातोळी खाजा, गुलाबजामुन हे गोड पदार्थही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. 15 दिवस चालणाऱ्या या जत्रेला ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातले भाविक आवर्जून भेट देतात.