कल्याण : जुन्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या दोघांना क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. यात एका बँकेच्या मॅनेजरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघांकडूनही पोलिसांनी 2 हजारांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. बँक मॅनेजरकडून 2 हजारांच्या 622 नोटा तर दुसऱ्या व्यक्तीकडून 2 हजारांच्या 831 नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

कल्याण शीळ मार्गावरील बंटी हॉटेलच्या परिसरात नोटा बदलण्यासाठी बँक मॅनेजर आणि एक व्यावसायिक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी दोघांनाही नोटांसह ताब्यात घेतलं आहे. यात इंडसइंड बँकेच्या बिझनेस मॅनेजर असलेल्या सुंदरम सुब्रह्मण्यम आणि कळव्यातील व्यापारी चेतन पाटील या दोघांना रंगेहाथ पकडलं आहे.  दोघांकडूनही जवळपास 30 लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

तर दुसऱ्या घटनेत वाशी सेक्टर 21 मध्ये राहणारा मोहम्मद मुस्तफा शेख याला 2 हजारांच्या नवीन 831 नोटांसह (16 लाख 62 हजार रुपये) याच परिसरात पकडले. 2 हजारांच्या नविन नोटांसह त्याच्याकडे 1000 च्या 3 आणि 500 रुपयांच्या 72 जुन्या नोटाही आढळून आल्या आहेत.

दरम्यान या दोन्ही घटनांमुळे एकच खळबळ उडाली असून बँकेच्या मॅनेजरला पकडण्यात आल्याने आता तर बँकांच्या फसवेगिरीवर शिक्कामोर्तब झालं आहे.