वसई: नोटबंदीला अडीच महिने उलटले तरी त्याचे दुष्परिणाम आजही सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. वसईच्या गौराईपाडामध्ये राहणाऱ्या एका सामान्य दुकानदाराला तब्बल 19 हजाराची चिल्लर घेऊन बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

नोटबंदीनंतर बँकांबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा पाहून कुर्बान वारसी यांनी गर्दी कमी झाल्यानंतर पैसे जमा करु असा निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय त्यांना तापदायक ठरतो आहे. त्यांच्याकडे असलेली 19 हजारांची चिल्लर कोणतीही बँक स्वीकारत नाही.

कुर्बान वारसी यांच्या दुकानात सुई, दोरा, फॉल, अस्तर, बटण असं टेलरिंगचे सामान विकलं जातं. अवघं एक रुपयापासून ते पन्नास रुपायापर्यंत हे मटेरिअल वारसी विकत असतात. त्यामुळे त्याच्याकडे दहा रुपयाचे चिल्लर भरपूर जमा झाले.

एवढी चिल्लर मोजायचा कंटाळा आणि तिजोरीत जागा नसल्याचं कारण देत प्रत्येक बँकेकडून वारसी यांना केवळ नकारच मिळतो आहे. इतकंच नव्हे तर त्यांची खिल्लीही उडवली जाते आहे. खरंतर रिझर्व्ह बँकेनं चलनात आणलेलं कोणतंही चलन मग त्या नोटा असो वा नाणं ते प्रत्येक बँकेनं स्वीकारलंच पाहिजे. मात्र, तरीही बँकांकडून अशी वागणूक मिळाल्यानं संताप व्यक्त केला जातो आहे.