मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला. भाजपमधील अनिल भोसले यांनी आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एबीपी माझाला खास मुलाखत दिली.
'शिवसेना आणि भाजप सत्तेसाठी हपापलेले'
भाजपला आता वाटत आहे की, आपण दोन नंबरवर राहू. त्यामुळे आता युतीसाठी हालचाली वाढल्या आहेत. जर शिवसेना नंबर एक राहणार असेल तर युती करावीच लागेल अशी भाजपची भूमिका आहे. भाजप नेहमी सर्व्हे करतं त्यात त्यांना दुसरा नंबर दिसू लागला आहे. म्हणून आता सर्व आरोप बाजूला ठेवले आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण-कोणाचे दात मोजत होतं, कोण दातात हात घालत होतं? त्यामुळे दोघंही सत्तेसाठी हपापलेले आहेत. त्यामुळे युती केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही.
'मुंबईत पहिल्या नंबरवर येण्यासाठी भाजपची धडपड'
मुंबईकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. मुंबई पालिकेनंतर उत्तर प्रदेशात निवडणूक आहेत. त्यामुळे जर भाजप मुंबईत क्रमांक एकवर राहिला नाही तर उत्तरप्रदेशमध्ये वेगळं चित्रं दिसेल. असे वरून आदेश आले आहेत.
'भाजप जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत आहे'
अनेक गुंडांना भाजपने प्रवेश दिला, मग माध्यमांनी आवाज उचल्यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. जुन्या कार्यकर्त्यांना भाजप बाजूला करत आहे.
भाजपच्या अनिल भोसलेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
अनेक वर्ष भाजपमध्ये काम करत असणाऱ्या अनिल भोसले यांचा आज पक्ष प्रवेश झाला, एका हाडाचा कार्यकर्ता म्हणून अनिल दादांची ओळख आहे. भाजपच्या कामाची पद्धत पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या स्थापनेपासून ज्यांनी कार्यकर्ते वाढवले, त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला. त्यांनी दोन वेळा भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मी देखील त्यांना विचारलं की, तुम्ही आमच्या पक्षात का? काही जण नाराज होतात तर काही जण निराश होतात. त्यांची निराशा झाली. भाजपच्या घोषणाबाजीचे हे परिणाम आहेत. कृती काही नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.