मुंबई : वांद्रे स्थानकापासून कलानगरपर्यंत जाणारा मुंबईतील पहिला स्कायवॉक गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. मात्र येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा एफओबी पादचाऱ्यांसाठी पुन्हा खुला होईल, अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.


येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हिजेटिआयकडून पूर्ण होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत ते आपला अंतिम अहवाल सादर करतील. शुक्रवारी यासंदर्भात पालिकेनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली. तसेच या अहवाल म्हटले आहे की, सध्या या पुलाला कोणताही धोका नसला तरी, अंतिम अहवाल येईपर्यंत हा पूल बंदच ठेवावा.

वांद्रे स्थानकापासून कलानगरपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना कारावा लागू नये, यासाठी हा स्कायवॉक बांधण्यात आला. मात्र काही कारणास्तव हा स्कायवॉक एमएमआरडीएने बंद केला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून हा स्कायवॉक बंद असल्याने लाखो पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या स्कायवॉकच्या दुरुस्तीप्रकरणी वांद्रे येथील रहिवासी के. पी. पी. नायर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याप्रकरणी एमएमआरडीएसह पालिका प्रशासनाला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं.