Malegaon Blast Case: मालेगाव ब्लास्ट 2008 च्या खटल्यातील (Malegaon Blast Case) मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितनं (Prasad Purohit) हा खटला इन-कॅमेरा घेण्याची मागणी पुन्हा एकदा विशेष एनआयए न्यायालयाकडे (NIA Special Court) केली आहे. या खटल्याच्या सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडून होणाऱ्या वृत्तांकनावर पाकिस्तानात (Pakistan) वेबमालिका (Web Series) तयार करण्यात आल्याची माहिती पुरोहितच्या वकिलांनी न्यायालयाला एक चित्रफित दाखवून दिली. त्यामुळे भारतीय मीडियाच्या वृत्तांकनाचा पाकिस्तानातील आयएसआयकडून (ISI) गैरवापर होत असल्याचा दावाही या अर्जातून केला गेला आहे. 


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात मालेगाव खटल्यावर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे. मंगळवारच्या सुनावणीदरम्यान पुरोहित यांनी थेट न्यायाधीशांसोबत संवाद साधत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना या खटल्याच्या सुनावणीचं वृत्तांकन करण्यापासून रोखण्याची मागणी केली. या खटल्याशी संबंधित असलेल्यांना वकिलांना, इतर आरोपींनाही थेट मीडियाशी बोलण्यापासून बंदी घालण्याचीही विनंती पुरोहित यांनी कोर्टाकडे केली. सदर बाब देशासाठी योग्य नाही आपण ही मागणी कोणत्याही चुकीच्या हेतूनं केलेली नाही त्यामागे एक व्यापक हित असल्याचंही पुरोहित यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुरोहित यांनी ही मागणी करण्याची ही काही पहिली वेळ नाही, याआधी एकदा ती मान्यही करण्यात आली होती. मात्र मुंबईतील कोर्टाचं वार्तांकन करणा-या पत्रकारांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत हे आदेश रद्द करून घेतले होते.


खटल्याच्या सुनावणीला जाणूनबुजून उशीर, साध्वीचा नवा अर्ज


या खटल्याच्या सुनावणीला राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) जाणूनबूजून विलंब करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक आणि भोपाळच्या विद्यमान भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात अर्जाद्वारे हा आरोप केला आहे. त्यामुळे खटला जलदगतीनं चालवण्याच्या आरोपींच्या अधिकारांचं थेट उल्लंघन होत असल्याचंही ठाकूर यांनी या अर्जात म्हटलेलं आहे. मात्र एनआयएकडून याचा विरोध करण्यात आला. दररोज चालणाऱ्या खटल्याला गती देण्याचा सर्वेतोपरी प्रयत्न करत असल्याचं एनआयएकडून कोर्टाला सांगण्यात आलं.


हायकोर्टाकडून दिलासा नाही


दरम्यान, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) नकार दिला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एनआयए कोर्टात सुरू असलेल्या मालेगाव ब्लास्ट (Malegaon Bomb Blast) 2008 च्या खटल्याला स्थगिती देणार नाही. याचा पुनरूच्चार करत न्यायमूर्तीनी सोमवारी केला. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून दोषमुक्त करावे अशी विनंती करणारी याचिका लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी दाखल केली होती.