ठाणे : चीन विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचे ठाण्यात बघायला मिळत आहे. ठाण्यात शनिवारी मनसैनिकांनी दोन ठिकाणी चिनी वस्तुंच्या विरोधात आंदोलन केले. एका ठिकाणी चिनी इलेक्ट्रॉनिक सामानाची होळी करण्यात आली. तर दुसरीकडे चिनी कंपनीच्या एका मोबाईलचे शो रूम बंद करण्यात आले. ठाण्यात काल देखील असेच मोठे आंदोलन झाले होते ज्यात एका चिनी बांधकाम कंपनीचे बांधकाम बंद करण्यात आले होते. भारत आणि चीन मध्ये सीमेवर विवाद सुरु असताना आणि आपले 20 सैनिक शहीद झाले असताना या कंपन्यांना इथे व्यापार करूच देणार नाही असा पवित्रा मनसेने घेतला आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर वन प्लस मोबाईलचे शो रूम आहे. हे शो रूम चीनी उत्पादनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या मनसैनिकांनी बंद पाडले. यावेळी मनसैनिकांनी वनप्लस मोबाइलची होळी केली. तिथे शो रूममध्ये असलेल्या कर्मचारी आणि मालकाला दम देण्यात आला. जोपर्यंत हा वाद शांत होत नाही, तोपर्यंत शो रूम बंद ठेवण्यास सांगण्यात आले. यावेळी महिंद्रकार यांनी ठाण्यातील सर्वच चिनी मोबाईलचे शो रूम बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तर दुसरीकडे कोलबाड येथे चीनकडून सतत होत असलेला हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने चीनचा झेंडा जाळून तसेच मोबाईल आणि टीव्ही जाळून निषेध केला गेला. यावेळी ठाणे शहर विधानसभा सचिव संजय भुजबळ शाखाध्यक्ष पीटर डिसूझा, अमेय केणी, माणतोष सिंघ मथारु आदी मनसैनिक उपस्थित होते. चीन विरोधात घोषणा देऊन या मनसैनिकांनी आपला निषेध नोंदवला.
शनिवारी ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी चीनच्या कंपनीचे बांधकाम बंद पाडल्यानंतर आता ठाण्यात विविध ठिकाणी मनसैनिक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईत केवळ 15 दिवसांत 300 'ऑक्सीजन बेड'सह 1 हजार खाटांच्या उपचार केंद्राची निर्मिती
एपीएमसी मार्केट मधील माथाडी कामगारांना विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी