मुंबई : भायखळा पूर्व परिसरात असणाऱ्या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील 'रीचर्डसन आणि क्रुडास' कंपनीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपातील एक मोठे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात उभारण्यात येत असलेल्या या तब्बल 1 हजार खाटांची क्षमता असलेल्या उपचार केंद्राच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे उपचार केंद्र जून महिन्याच्या अखेरीस रुग्ण सेवेत दाखल होईल, अशी माहिती 'इ' विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली आहे.


'कोरोना कोविड 19' बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत.



'कोविड कोरोना 19' बाधित रुग्णांवर उपचार करताना शरीरातील प्राणवायूच्या पातळीची अर्थात 'ऑक्सिजन लेव्हल'ची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी असणाऱ्या 1 हजार खाटांपैकी 300 खाटा या 'ऑक्सीजन बेड' असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 50 डॉक्टर्स, 100 नर्सेस आणि 150 परिचर व इतर वैद्यकीय कर्मचारी; असे एकूण 300 कर्मचारी दिवसाचे अव्याहतपणे कार्यरत असणार आहेत. याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका व रुग्णसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर बाबी देखील गरजेनुरूप उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत.


कोरोना संसर्गावर 103 रुपयांची गोळी प्रभावी; ग्लेनमार्क कंपनीचा दावा


हे काम आता अंतिम टप्प्यात असून या महिना अखेरीस हे 'जम्बो फॅसिलिटी' उपचार केंद्र कार्यान्वित होईल. या उपचार केंद्राच्या उभारणीच्या अनुषंगाने वैद्यकीय विषयक बाबींचे नियोजन करण्याची जबाबदारी 'परिमंडळ 1'चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद आष्टेकर आणि 'इ' विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर निपा मेहता यांनी सांभाळली, अशीही माहिती यानिमित्ताने दगडखैर यांनी दिली आहे.


केवळ 15 दिवसात 1 हजार खाटांचे रुग्णालय
तब्बल 1 हजार खाटांचे हे तात्पुरत्या स्वरूपातील उपचार केंद्र उभारण्यास 10 जून 2020 ला सुरुवात झाली. त्यानंतर अक्षरश: दिवस-रात्र पद्धतीने उपचार केंद्राची उभारणी सुरू असून महापालिकेचे अनेक अभियंते, कामगार, कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस राबत आहेत. या महिना अखेरीस हे उपचार केंद्र रूग्णात सेवेत दाखल होणार असल्याने केवळ 15 ते 20 दिवसात या उपचार केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.


CM Uddhav Thackeray | कोरोनाचं संकट नष्ट होवो, मुख्यमंत्र्यांचं अंबाबाईला साकडं