मुंबई : पंतप्रधान मोदी कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. नोटाबंदीचा अणुबॉम्ब टाकून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे हिरोशिमा-नागासाकी केल्याचा आरोप 'सामना'तून केला गेला आहे. नोटाबंदीनंतर उद्योग जगतातल्या असोचेम संघटनेने 40 लाख नोकऱ्या गेल्याचा दावा केला आहे. त्यावरुन 'सामना'तून पुन्हा एकदा मोदींवर टीका करण्यात आली आहे.


"मोदींनी अर्थव्यवस्थेचं हिरोशिमा-नागासाकी केलंय"

'सामाना'च्या अग्रलेखातून शिवेसनेने मोदींवर निशाणा साधला आहे. 'सामाना'त म्हटलंय, "मोदी हे आज कुणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचेही ऐकले नाही. मंत्रिमंडळात ज्याप्रमाणे मुके-बहिरे पोपट बसवले आहेत त्या धर्तीचेच गव्हर्नर रिझर्व्ह बँकेवर नेमून देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून टाकली आहे. उद्योग जगताच्या ‘असोचेम’ या संघटनेने तर काल सांगून टाकले, नोटांबदीनंतर देशात ४० लाख नोकऱया आतापर्यंत गेल्या व आणखी जातील. म्हणजे नोटाबंदीचा अणुबॉम्ब टाकून मोदी यांनी हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचे हिरोशिमा, नागासाकी केले."

शरद पवारांवरही निशाणा

"नोटाबंदीच्या निर्णयाचे पवार यांनी आधी स्वागत केले होते. आता हळूहळू स्वागताचे रूपांतर जोरदार विरोधात होऊ लागले आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रालाच नोटाबंदीचा फटका बसल्याने पवारांची वेदना मुखातून बाहेर पडली आहे.", असे म्हणत 'सामना'तून शरद पवारांवरही टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात एकीकडे चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीकेची तुफान जोड उठवत आहेत. त्यात आता शिवसेनेने थेट पंतप्रधान मोदींवरच नोटाबंदीच्या निर्णयावरुन टीकास्त्र सोडलं असल्याने शिवसेना-भाजपमधील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.