मुंबई : शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सोबतचं काँग्रेसजनांना जे वाटले ते त्या बोलल्या, असे म्हणत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भूमिकेचंही समर्थन केलं आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. त्यावर "सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं," असं ट्वीट काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि राज्याच्या महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. त्यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली नाराजी बोलून दाखवली.


काय म्हणाले बाळासाहेब थोरात?


राहुल गांधी यांना पक्षात स्वीकारार्हता असून ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. राहुल गांधी यांनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करत आहेत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत. ते करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात, त्याचा परिणाम असतो. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत, त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र, ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. काँग्रेसजणांना जे वाटले ते त्या बोलल्या आहेत. आमच्या काँग्रेस जणांचे मत यशोमती ठाकूर यांनी मांडले आहे.


सरकार स्थिर राहावं असे वाटत असेल तर काँग्रेस नेतृत्त्वावर बोलणं टाळावं : यशोमती ठाकूर यांचं ट्वीट


शरद पवार काय म्हणाले होते?
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय आहे? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर आज काँग्रेसमधली रँक आणि फाईलची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरु घराण्याची आस्था काँग्रेसजनांमध्ये आहे. सोनिया आणि राहुल त्याच घराण्यातील असल्यामुळे त्या पक्षातील बहुतांश लोक त्याच विचारसरणीचे आहेत, असं पवार म्हणाले. राहुल गांधींचं नेतृत्त्व मानायला तयार आहेत का असं विचारला असता पवार म्हणाले की, "त्यांच्यात कन्सिस्टन्सी कमी आहे."


Yashomati Thakur | सरकार स्थिर चालवायचं असेल तर काँग्रेस श्रेष्ठींवर बोलणं टाळा : यशोमती ठाकूर