मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं राष्ट्रीय स्मारक लवकरच पूर्णत्वास येणार आहे. येत्या जुलै महिन्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेली टेंडर प्रक्रिया आता एमएमआरडीए महिनाभरातच पुर्ण करणार. यानंतर जुलै महिन्यात भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला सुरवात होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजाँय मेहता, बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएणआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या.



गेली पाच वर्षे विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अखेरीस आता शिवसेनाप्रमुखांचं राष्ट्रीय स्मारक आकारास येणार आहे.

मुंबई महापौर बंगल्यात असेल अंडरग्राऊंड स्मारक

मुंबईतील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हे अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडं आहेत. ही झाडं न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारण्यात येणार आहे.

महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कमी पडली असती. नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत बाळासाहेबांचं अंडरग्राऊंड स्मारक तयार होणार आहे. बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल अशा वास्तू अंडरग्राउंड असतील. सध्याची महापौर बंगल्याची वास्तू ही हेरिटेज असल्यामुळे तिच्या मूळ रचनेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत.