मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांनी मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी कोर्टाने 10 जूनपर्यंत तहकूब केली आहे. कारण आरोपींचा ताबा मिळावा म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सहा जून रोजी सुनावणी होणार आहे, या सुनावणीवर आरोपी महिला डॉक्टरांच्या जामिनाचं भवितव्य अवलंबून आहे.
डॉ. पायलने रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप पोलिसांनी तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांवर केला आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
तिन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान पोलिसांनी जामिनावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आरोपींच्या चौकशीला पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा त्यांचा ताबा देण्याची मागणी गुन्हे शाखेने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. यावर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे याचिकेचा सादर केला असता हायकोर्टाने गुरुवारी याचिकेवर सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे.
पायलच्या आत्महत्येबाबतची कोणतीही चिठ्ठी पोलिसांना मिळालेली नाही. तसेच यासंदर्भात काही जणांचे जबाब घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोपींचा पुन्हा ताबा देण्याची मागणी पोलिसांनी हायकोर्टात केली आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
04 Jun 2019 09:28 PM (IST)
डॉ. पायलने रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप पोलिसांनी तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांवर केला आहे.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -