बाळासाहेब ठाकरे ट्रस्टच्या सदस्यत्वासाठी सेना नेत्यांमध्ये चुरस
एबीपी माझा वेब टीम | 14 Sep 2016 02:56 PM (IST)
मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या महापौर बंगल्यातील स्माराकासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाने मंजूर केला आहे. लवकरच स्मारकासाठी पब्लिक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. या ट्रस्टच्या सदस्यत्वासाठी शिवसेना नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं वृत्त आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टमध्ये 7 ते 11 सदस्यांचे समावेश असणार आहे. या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं सदस्यत्व कायम असणार आहे. तर बीएमसी आणि राज्यातील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सदस्यत्व देण्यात येणार आहे. मात्र त्यासोबतच शिवसेना पक्षातील आणखी दोन जणांची या ट्रस्टवर सदस्य म्हणून नेमणूक होणार आहे. या सदस्यत्वासाठी शिवसेना नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. या चढाओढीत शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके आणि संजय राऊत यांचा समावेश आहे. येत्या महिन्याभरात या पब्लिक ट्रस्टची नोंदणी होणार आहे.