बदलापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास... महाराष्ट्रावर प्रभाव पाडणारी दोन व्यक्तिमत्वं. या दोघांमधलं नातं आणखी घट्ट करणारा कागदोपत्री भक्कम पुरावा हाती लागला आहे.

1678 साली शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींना लिहिलेल्या सनदेची छायांकित प्रत सापडली आहे. विशेष म्हणजे या प्रतीवर शिवरायांचा शिक्काही छायांकित केलेला आहे.

15 सप्टेंबर 1678 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहिली. त्यात 33 गावं इनाम म्हणून दिल्याबाबतचं एक पत्र 1906 मध्ये समोर आलं होतं. मात्र या पत्राची मूळ प्रत उपलब्ध नव्हती.

अखेर मे 2017 मध्ये लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत या मूळ पत्राची छायांकित प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली आणि इतिहास संशोधक कौस्तुभ कस्तुरे यांनी ती जगासमोर आणली.

विशेष म्हणजे या सनदीमधील अक्षर हे बाळाजी आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे ती शिवकालीनच आहे हे सिद्ध होत आहे.

गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या गुरु-शिष्याच्या नात्यावर शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता हा शिवकालीन पुरावा उपलब्ध झाल्यानं त्यावर आणखी प्रकाश पडणार आहे.