मुंबई: बदलापूरमधील (Badlapur Case) ज्या शाळेत चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण घडलं त्या शाळेच्या संस्थाचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली आहे. शाळेचे संस्थाचालक तुषार आपटे (Tushar Apte) आणि उदय कोतवाल (Uday Kotwal) यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.  दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदे यानं पोलिसांच्या गाडीमध्ये रिवॉल्वर घेत गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले. यामध्ये एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला दुखापत झाली.  तर, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.


बदलापूरच्या शाळेच्या संस्थाचालकांची हायकोर्टात धाव


बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती.तर, या प्रकरणात शाळा प्रशासनाची भूमिका देखील वादग्रस्त ठरली होती. त्यामुळं बदलापूर रेल्वे स्टेशनला ज्यावेळी आंदोलन झालं होतं तेव्हा शाळेत देखील तोडफोड झाल्याची घटना घडली होती. बदलापूरच्या अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेच्या चेअरमन आणि सचिवांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.  


बदलापूरच्या घटनेनंतर चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपात संस्थाचालकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयानं यापूर्वी संस्थाचालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आर.एन. लड्डा यांनी शाळेचे संस्थाचालक आणि सचिवांच्या याचिकेवर 1 ऑक्टोबरला सुनावणीची तारीख दिली होती. गेल्या महिन्यात ज्यावेळी बदलापूर अत्याचार प्रकरण उघडकीस आलं होतं त्यावेळी मुंबई हायकोर्टानं स्वत: या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारला खडेबोल सुनावले होते. 


अक्षय शिंदेचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू


बदलापूरच्या एका संस्थेच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती.  ठाणे पोलिसांच्या सीआययू यूनिटच्या पोलिसांनी तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं. मुंब्रा बायपास येथे पोहोचल्यावर अक्षय शिंदेनं पोलिसांकडून रिवॉल्वर हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानं तीन राऊंड फायर केले त्यापैकी एक गोळी एपीआय निलेश मोरे यांना लागल्याचं सांगण्यात आलं. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला कळवा येथील रुग्णालयात नेण्यात आलं तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.  


दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरवर विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. बदलापूरच्या शाळेच्या संस्थाचालकांना अद्याप अटक का झालेली नाही,असा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.


इतर बातम्या :


Akshay Shinde Encounter : रस्ता क्रॉस करतानाही तो हात पकडायचा, तो गोळीबार कसा करू शकतो? एन्काऊंटर झालेल्या अक्षय शिंदेची आई काय म्हणाली?