नवी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या परिवाराविरोधात तक्रार करणारे तक्रारदार पंढरीनाथ साबळे हे गायब झाले असून त्यांचा मनसुख हिरेन होण्याची भीती स्वतः किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली आहे. साबळे यांनी त्यांचा बदलापूरमधील जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर साबळे राहतच नसून, त्यामुळे साबळे यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी किरीट सोमैय्या यांनी बदलापूर पूर्व पोलिसांकडे केली आहे.
भाजप नेते किरीट सोमैय्या आणि त्यांच्या परिवाराने आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार बदलापूरमधील पंढरीनाथ साबळे यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. 23 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात आलेल्या या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने या तक्रारीची चौकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणात सोमैय्या परिवाराविरोधात कोणताही गुन्हा दाखल होत नसल्याचं सांगत ती चौकशी बंद केली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबर 2022 रोजी याबाबतचा क्लोजर रिपोर्ट तक्रारदार पंढरीनाथ साबळे यांना मुंबई पोलिसांनी पाठवला होता.
दरम्यान, पंढरीनाथ साबळे यांनी स्वतःचा बदलापूरमधील जो पत्ता दिला होता, त्या पत्त्यावर ते स्वतः राहातच नसल्याची बाब किरीट सोमैय्या यांच्या निदर्शनास आली. सदर पत्त्यावरील घर हे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने असून तिथे अरविंद जगताप नावाची व्यक्ती वास्तव्याला असल्याची बाब किरीट सोमैय्या यांनी समोर आणली. तर तक्रारदार पंढरीनाथ साबळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते देखील सापडू शकले नाहीत. त्यामुळे ठाकरे सरकारने माझ्या परिवाराविरोधात तक्रार करण्यासाठी पंढरीनाथ साबळे याचा वापर करून घेतला आणि नंतर त्याचा मनसुख हिरेन करण्यात आला, अशी भीती किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली आहे.
याबाबतची तक्रार करण्यासाठी किरीट सोमैय्या हे आज बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी खोटा पत्ता देऊन माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या पंढरीनाथ साबळे यांना शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. सोबतच पंढरीनाथ साबळे हा सध्या गायब झाला असून त्याचा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन केला असावा, अशी भीती किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली. तसंच हा तक्रारदार जर खोटा असेल, तर त्याच्या नावाने मुंबई पोलिसांनी तक्रार कशी नोंदवून घेतली? असा सवाल करत तक्रारदार खोटा असू शकत नाही, असंही सोमैय्या म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात पंढरीनाथ साबळे हा व्यक्ती नेमका कोण आहे? आणि तो सध्या कुठे आहे? हे शोधण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
या सगळ्याबाबत अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांना विचारलं असता, सोमैय्या यांच्या विरोधातली तक्रार ही मुंबई पोलिसांकडे करण्यात आली असून तक्रारदाराचा पत्ता खरा आहे की खोटा याची शहानिशा करून आम्ही तसा अहवाल मुंबई पोलिसांना सादर करू, अशी माहिती जगदीश सातव यांनी दिली. तसंच पुढील कारवाई करण्याचे अधिकार हे मुंबई पोलिसांना असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.