कल्याण : रुग्णवाहिकेत स्ट्रेचर नसल्यानं 70 वर्षांचे वृद्ध कोरोना संशयित आजोबा अक्षरशः चौथ्या मजल्यावरून सरपटत खाली आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकारानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त होत आहे.


कल्याण पूर्वेत राहणाऱ्या या 70 वर्षीय आजोबांच्या 2  मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 21 मे रोजी दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी रुग्णवाहिका नसल्याचं कारण देत त्यांना 23 मे रोजी रुग्णालयात नेण्यात आलं. यानंतर त्यांच्या वृद्ध आईवडिलांनाही संशयित म्हणून क्वारंटाईन करण्यासाठी नेलं जाणार होतं. यासाठी त्यांना घ्यायला रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली, मात्र त्यात स्ट्रेचर नव्हता, त्यामुळे 70 वर्षाच्या वृद्ध आजोबांना इमारतीच्या खाली यायला सांगण्यात आलं.


आजोबांना चालता येत नसल्यामुळे ते अक्षरशः सरपटत चौथ्या मजल्यावरून खाली आले. मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका चालक थांबायला तयार नसल्यानं तो रुग्णवाहिका घेऊन निघून गेला. इतकंच नव्हे, तर त्यांना आता चालत या, असा निरोपही त्यांना देण्यात आला होता. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी रुग्णवाहिका नसल्यानं एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयापर्यंत चालत जावं लागल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला होता. यानंतर केडीएमसी आयुक्तांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र आजोबांना सरपटत यावं लागण्याची घटना अक्षम्य असून याप्रकरणी थेट केडीएमसी आयुक्तांवरच कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.