मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी(Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांचा अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या अकराव्या आरोपीचं नाव अमित कुमार असं आहे. त्याच वय 29 वर्ष असून त्याला हरियाणातील कैथल येथून अटक करण्यात आली. पोलीस दलातील एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी झीशान अख्तर हा जालंधरच्या तुरुंगातून 7 जून 2024  रोजी सुटला होता. त्यानंतर तो एका फरार आरोपीच्या मदतीनं अमित कुमारच्या संपर्कात आला होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित कुमारनं त्याला बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची माहिती मिळाली होती, असं चौकशीमध्ये मान्य केलं आहे. झीशान अख्तरनं अमित कुमारवर एक काम सोपवलं होतं. अमित कुमारच्या खात्यात एक व्यक्ती पैसे पाठवेल ती रक्कम काढून झीशान अख्तरला द्यायचे होते. एका त्रयस्थ व्यक्तीनं अमित कुमारच्या खात्यात दोन ते अडीच लाख रुपये पाठवले होते. ती रक्कम वेगवेगळ्या वेळी 8 वेळा  अमित कुमारनं त्याच्या खात्यातून पैसे काढून झीशान अख्तरला दिले होते.  


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट प्राथमिक पातळीवर होता त्यावेळी अमित कुमार त्याच्या खात्यातून काढून झीशान अख्तरला दिले होते.  


आरोपी अमित कुमारचं शिक्षण 12 वी पर्यंत झालं असून तो दारुचं दुकान चालवतो. इतर वेळा त्या भागात आपला दबदबा राहावा म्हणून कोणत्या ना कोणत्या गँगसाठी तो काम करत होता.  मुंबई पोलिसांनी अमित कुमारला आज कोर्टात हजर केलं, त्यावेळी त्याला 4 नोव्हेबंरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं.  


बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अकरा जणांना अटक, तिघे फरार


मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. गुलमेर सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणखर, हरिशकुमार निषाद, नितीन सापरे, राम कनोजिया, संभाजी पारधी, प्रदीप ठोंबरे, चेतन पारधी, भगवंत सिंह आणि अमित कुमार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आतापर्यंत झीशान अख्तर, शिवकुमार गौतम आणि शुभम लोणकर फरार आहेत.


दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी कुर्ला येथील पटेल चाळीत एक खोली भाड्यानं घेतली होती. दुप्पट पैसे देऊन मारेकऱ्यांनी खोली भाड्यानं घेतली होती.


इतर बातम्या :


शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी


Uddhav Thackeray Shiv Sena Candidate List 2024 : झिशान सिद्दीकींविरुद्ध वरुण सरदेसाई, मुंबईच्या मैदानात उद्धव ठाकरेंचे 13 शिलेदार; आदित्य ठाकरेही रणांगणात