मुंबई : आज 'आजादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाचा नुसता उत्सव नाही. तर हा जात, पात, धर्म या पलीकडे जाऊन देशा प्रति आपल्या सगळ्यांच्या भावनांचा सन्मान आहे.  75 वर्ष पूर्ण करतो आहोत. कुर्बानीची पण आठवण ठेवत आहोत.  जे शहीद झाले त्यांची आठवण काढतो पण तितकंच मर्यादित नाही.  त्यांनी बलिदान केलं आहे. त्यांना अभिमान वाटेल अस जगणं असा देश उभा करू शकलो का हा प्रश्न आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 


ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य असं मुख्यमंत्री म्हणाले.


ते म्हणाले, स्वराज्य आधी की सुराज्य आधी हा मुद्दा होता. आता स्वराज्याला 75 वर्ष झाली. सुराज्य आलं का? याचा विचार कोण करणार. आज हे मैदान निशब्द आहे.   कुर्बानी देऊन हे स्वातंत्र्य मिळाले आहे. आपल्या पिढीला आयतं मिळालंय. त्याचे रक्षण करणे हे आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्याचे तेज जपले पाहिजे. हे मैदान बोललं पाहिजे, तो इतिहास जिवंत करणार स्मारक इथे झालं पाहिजे, असं ते म्हणाले. 


मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,  स्वातंत्र्याच्या 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी वर्षभर चालणाऱ्या चांगल्या उपक्रमाची सुरवात झाली आहे.  लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी नेतृत्व केलं ,देशाला सर्वसमावेशक चळवळ सुरू केली. मुख्यमंत्र्यांना विनंती करीन स्वातंत्र्याचे हे केंद्र आहे. इथून सगळ्यांना प्रेरणा मिळेल, असं एक स्थान निर्माण करावं अशी इच्छा व्यक्त करतो, असं ते म्हणाले.  


मंत्री अस्लम शेख म्हणाले की, आज या मंचावरील लोकांची विचारधारा वेगळी असली तरी सगळ्यांचे लक्ष्य देशाला चांगले कसे बनवणे हेच असेल. राज्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करत आहे, असं ते म्हणाले.  


मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात हा उत्सव सुरु होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रती भावना दाखविली. अनेकांनी कुर्बांनी पत्करली. त्यांचे हौतात्म आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा.