मुंबई : महाराष्ट्रभरातील रिक्षा चालक-मालक संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सरकारने जून महिन्याच्या अखेरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास 9 जुलैपासून राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र्र राज्य ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची बैठक आज पार पडली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.


महाराष्ट्र्र राज्य ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या बैठकीत संपावर जाण्याबाबत ठराव करण्यात आला. ऑटोरिक्षा चालक मालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. या मागण्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदनही संघटनेतर्फे देण्यात येणार आहे.


ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या मागण्या 30 जूनपर्यंत मान्य झाल्या नाही तर 9 जुलैपासून राज्यातील ऑटोरिक्षा चालक मालक संपावर जातील, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.


काय आहेत मागण्या?


- ऑटोरिक्षा चालक मालक संघटनासाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून हे महामंडळ परिवहन खात्यातंर्गत असावे.
- विमा कंपनीत भरले जाणारे पैसे विमा कंपनीत न भरता महामंडळात भरावे.
- राज्यात अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक असावं.
- हकीम कमिटीच्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षाचे भाडे वाढवण्यात यावे.
- ओला, उबेर सारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांच्या सेवेवर त्वरित बंदी घालावी.
- महाराष्ट्र राज्यात ऑटोरिक्षा विमामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तात्काळ कमी करण्यात यावी.