अंबरनाथ (ठाणे) : मुजोर रिक्षाचालकांनी प्रवाशावर चाकूहल्ला केल्याची घटना अंबरनाथमधून समोर आली आहे. प्रवाशाला सुट्टे पैसे परत करण्यावरुन वाद झाला आणि यातून मुजोर रिक्षाचलकांनी प्रवाशावर चाकूने हल्ला केला.
अंबरनाथच्या एमआयडीसी भागात राहणारे हरिराम पासवान हे गुरुवारी त्यांचा भाऊ आणि एका मित्रासह स्टेशनहून घरी जात होते. अंबरनाथ स्टेशनबाहेरून त्यांनी 60 रुपये भाडं ठरवून लोकनगरी हायवेपर्यंत रिक्षा केली. लोकनगरी हायवेला उतरल्यावर त्यांनी रिक्षाचालकाला 100 रुपयांची नोट दिली, मात्र रिक्षाचालकाने उरलेले 40 रुपये देण्यास सरळ नकार देत दादागिरी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या तिघांनी त्याच्याशी हुज्जत घातली असता तिथल्याच इतर दोन रिक्षाचालकांनी या वादात उडी घेतली आणि त्यानंतर हरिराम पासवान याच्यावर चाकूने 5 ते 6 वार करण्यात आले.
या घटनेत हरिराम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत तातडीनं सूत्रं फिरवली आणि काही तासांतच तिन्ही आरोपी रिक्षाचालकांना अटक केली. दीपककुमार पाल, संतोष मिसाळ आणि चंद्रकांत सोनावणे अशी या तीन आरोपींची नावं असून त्यांना न्यायालयाने 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.