मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक वातानुकूलित विश्रामगृह बांधण्यात आला आहे. या विश्रामगृहाचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना या सेवेचा खास लाभ घेता येणार आहे.
12 तासांसाठी 150 रुपये, तर 24 तासांसाठी 250 रुपये इतक्या स्वस्त दरात प्रवाशांना या विश्रामगृहात राहण्याची सोय होणार आहे. या विश्रामगृहाचं बुकिंग PNR नंबर असलेल्या तिकीटधारकांनाच करता येणार असून, बुकिंगची सुविधा ऑनलाईन करण्यात आली आहेय.
पुरुषांसाठी असलेल्या विश्रामगृहातील बेड्सची संख्या 108, तर महिलांसाठी असलेल्या बेड्सची संख्या 40 एवढी आहे.
खरंतर सीएसटी स्थानकात विश्रामगृहाची सुविधा याआधीही होती. मात्र, मध्य रेल्वेने नव्या वातानुकूलित विश्रामगृहांत बेड्सची संख्या वाढवून अत्याधुनिक सुविधांमध्येही वाढ केली आहे. विश्रांतीगृहात थांबणाऱ्या प्रवाशास स्वतंत्र लॉकरची सुविधाही देण्यात येणार आहे.