भिवंडी | कामतघरमधील हनुमान नगर परिसरात किरकोळ कारणातून झालेल्या वादात दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच दुकानदारासह त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात आली आहे.


शहरातील कामतघर येथील  हनुमान नगर परिसरात मौर्या किराणा दुकानात सकाळच्या सुमारास एका ग्राहकाने दहा रुपयाचे पाव मागितले. दुकानदाराने ग्राहकाला दहा रुपयाचे पाच पाव दिले, मात्र ग्राहकाने दहा रुपयांमध्ये सहा पावांची मागणी केली. दुकानदाराने 6 पाव न दिल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन त्याचं पर्यावसान तोडफोडीत झालं.

ग्राहकाने आपल्यासोबत त्याचा मोठ्या भावासह कुटुंब व इतर साथीदार दुकानात पोहोचून दुकानदाराला मारहाण केली. तसंच दुकानदाराच्या कुटुंबीयांना देखील त्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत तीन ते चार जण जखमी झाले असून दिनेश मौर्या असे दुकानदाराचे नाव आहे. मारहाण करणारे आरोपी त्याच परिसरात राहतात. या मारहाणीचे चित्रीकरण एका स्थानिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सध्या भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.