मुंबई : कोरोना संकटात कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावणारे राज्यातील पोलीस सुरक्षित आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. तर अंबरनाथमध्ये टोळक्याने एका पोलिसाच्या डोक्यावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. त्यामुळे वर्दीवर हात उचलणाऱ्याचं काय करायचं हा प्रश्न विचारला जात आहे.


मुंबईत वाहतूक पोलिसाला मारहाण
मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिलेने मारहाण केली. वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसाने तिला रोखत कारवाई केली. परंतु पोलिसाने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा करत महिलेने पोलिसांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या मारहाण प्रकरणी आरोपी महिला सादविका तिवारी आणि तिचा मित्र मोहसीन खान यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


अंबरनाथमध्ये पोलिसावर तलवारीने वार
पोलीस स्टेशनबाहेरच पोलिसावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना काल (23 ऑक्टोबर)अंबरनाथमध्ये घडली होती. वाहतूक कोंडीवरुन झालेल्या वादातून चार जणांनी पोलिसावर तलवारीने हल्ला करुन पसार झाले आहेत. या घटनेत पोलीस कर्मचारी जबर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.


मुंबईत काय घडलं?
मुंबईत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ही महिला तिच्या मित्रासह दुचाकीवरुन एलटी मार्ग इथे आली होती. यावेळी तिच्या मित्राने हेल्मेट घातलं नव्हतं. त्यावेळी ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस हवालदार एकनाथ पार्टे यांनी त्यांना रोखून दंड भरण्यास सांगितला. परंतु त्यांनी दंड भरण्यास नकार दिलाच, पण त्यांच्यासोबत उद्धट भाषेत बाचाबाची केली. त्यानंतर पोलिसाला मारहाण केली. एकनाथ पार्टे यांच्या तक्रारीनंतर या दोघांवर एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.


आरोपींवर कठोर कारवाई होणारच : विश्वास नांगरे पाटील
ही घटना काल दुपारची आहे. एलटी मार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत हवालदार ड्युटी करत होते. यावेळी त्यांनी हेल्मेट न घातलेल्या दुचारीस्वाराला रोखलं आणि त्यानंतर झालेल्या बाचाबाची झाली. त्यानंतर या महिलेने पोलिसाला मारहाण केली. दुचाकीस्वाराला आणि महिलेला अटक करुन त्यांना कोर्टात हजर केलं असून त्यांच्या कोठडीची मागणी केली आहे. दोघांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. "कोविड संकटात 89 पोलिसांनी बलिदान दिलं आहे. आमचे कर्मचारी अतिशय तणावात आणि आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असतात. कारवाई करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचं मनोधैर्य कमी होतं. पोलीस कणखरपणे आणि प्रभावीपणे काम करत आहे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना नाही. पोलीस महिलेवर हात टाकू शकत नाही. अशा परिस्थितीतही पोलिसांने कोणतंही आक्षेपार्ह वर्तन केलेलं नाही.त्यांच्या धीर आणि संयमाला वाखाणलं पाहिजे. आरोपींविरोधा 352, 323 आणि क्रिमिनल अमेन्डमेंट अॅक्ट 3 आणि 7 अशी कलमं लावून त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. जेणेकडून अशा लोकांना चांगला संदेश जाईल," असंही विश्वास नांगरे पाटील म्हणाले.


मुंबई पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष द्याव : किरीट सोमय्या
"ही अंत्यत दुर्दैवी गोष्ट आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना हात जोडून विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या," अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. तसंच मुंबई पोलीस आयुक्त, ट्रॅफिक पोलीस आयुक्त यांना याबाबत जाब विचारणार असल्याचं सांगून या घटनेची चौकशी झालीच पाहिजे, असंही म्हटलं.


पोलिसांवरील हल्ले महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही : प्रवीण दरेकर
"पोलिसांना मारहाण करणं दुर्दैवी आहे. अशाप्रकारची हिंमत आणि धाडस करणं उचित नाही. यामुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होता," असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. "एकीकडे पोलिसांचा कळवळा असल्याचं सांगणाऱ्या सरकारला माझा प्रश्न आहे की, अशाप्रकारच्या गोष्टींवर काय करणार आहात? या लोकांवर कारवाई करुन धाक निर्माण झाला पाहिजे," असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं. "कोविडच्या संकटातही पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आताही हल्ले होत असतील तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही," असं दरेकर यांनी सांगितलं.


अशा लोकांवर जरब बसली पाहिजे : संजय राऊत
"पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचंच आहे. कर्तव्याचं पालन करणाऱ्या हवालदारावर हात टाकणारे हे लोक कोण आहेत आहेत? यांच्यात हिंमत कुठून येते? यात सरकार कोणाचं आहे हा प्रश्न नाही. मुंबई पोलीसच नाही तर देशातल्या कोणत्याही पोलिसांवर हात टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या महिलेने केलेला गुन्हा किती अक्षम्य आहे हे पोलिसांनी आणि न्यायालयाने दाखवण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना माफिया म्हणणं, त्यांच्यावर घाणेरडे आरोप करणं, मुंबई पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करण्याची जी मोहीम राबवली होती, त्यातून अशा लोकांना बळ मिळतं. पोलीस राजकारणासाठी नाहीत. पोलीस असुरक्षित नाही. असे माथेफिरु सगळीकडे असतात. हे माथेफिरुपणाचं लक्षण आहे. कायदा, पोलीस आमचं काय बिघडवणार आहेत, अशा यांची मानसिकता आहे. पोलिसांनी त्यांचं बिघडवून दाखवावं. पोलिसांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, अशी जरब बसली पाहिजे," अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.