ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई या तीनही महानगरांना समुद्र आणि खाडीच्या पाण्यापासून सुरक्षित ठेवतो तो कांदळवनाचा प्रदेश. खाडी किनारी विस्तीर्ण पसरलेला हा प्रदेश एखाद्या भिंतीप्रमाणे आपली सुरक्षा करतो. मात्र, याच कांदळवनातील तिवरांवर एका किड्याने असा काही हल्ला केलाय की तिवरांची सर्व पाने गायब झाली आहेत. त्यामुळे तिवराचे पूर्ण जंगल सुकल्या प्रमाणे दिसू लागले आहे.
हा किडा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे नाव आहे टिक डिफॉलिएटर. शास्त्रीय भाषेत त्याला हायब्लिया प्युएरा असे म्हणतात. हा एक पतंग असून, याच पतंगाच्या अळीने तिवरांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे सर्व तिवरांची पाने नाहीशी झाली आहेत. आक्रमण सध्या तरी ठाणे, आणि नवी मुंबईच्या खाडी किनारी असलेल्या तिवरांवर दिसून येते आहेत. इतर ठिकाणी त्याने आक्रमण केलेलं नाही. "मात्र ही अळी इतक्या वेगाने वाढते की अगदी काही दिवसात अनेक किलोमीटरवर पसरलेल्या तिवरांच्या झाडाची पाने नष्ट होतात. या अळीचा प्रादुर्भाव दक्षिण आशियात सर्वत्र आढळतो. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान ही अळी आक्रमण करते, त्यानंतर तिचा पतंग बनतो", असे मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या असिस्टंट डायरेक्टर, शीतल पाचपांडे यांनी सांगितले आहे.
या अळीचे खरे खाद्य सागाचे झाड होते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यात बदल होऊन कांदळवनातील तिवरांवर या अळ्या आक्रमण करू लागल्यात. या आक्रमनातून तिवरांचा बचाव होणे अशक्य आहे. मात्र, तीवर सोडून इतर कोणत्याही झाडांवर या अळ्या जात नाहीत. त्यामुळे या झालेल्या बदलाचा तिवरांवर काय प्रभाव होतोय त्याचा अभ्यास आता, महाराष्ट्र कांदळवन विभाग आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशन मार्फत केला जातोय.
"या अळीच्या आक्रमणामुळे तिवरांची पाने नष्ट होतात, मात्र नक्की हा बदल चांगला की वाईट याचा अभ्यास आम्ही करतोय, कोणकोणते पक्षी या अळ्या खातात तेही आम्ही निरीक्षण करतो आहोत. कारण संपूर्ण पाने नष्ट झाल्यावर देखील या अळ्यांचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पुन्हा तिवरांची झाडे आधी सारखी सदा हरित होतात", असे शीतल पाचपांडे यांनी सांगितले.
सागाच्या झाडावरील टिक डिफॉलिएटर तिवरांच्या झाडावर कसा येऊ लागला हा एक नवीन अभ्यासाचा विषय आहे. आधी सदाहरित असलेली तिवरांची झाडे त्यामुळे 2 महिने पानविराहित होत असल्याने या कांदळवनावर आणि त्यावर अवलंबून असलेल्या पर्यावरणतील जीवांवर चांगला की वाईट परिणाम होतोय याचा देखील सखोल अभ्यास करावा लागणार आहे. मात्र, निसर्गाच्या चक्रात झालेल्या बदलामागे कारण देखील असते आणि त्याचा परिणाम देखील दिसून येतो हे विसरून चालणार नाही.