मुंबई :  मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर (Atal Setu)  भेगा पडल्या असा दावा काँग्रेसनं केलाय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी आज अटल सेतूवर जाऊन पाहणी केली. या सरकारला जनतेच्या सुरक्षेशी काहीही देणंघेणं नाही, खुद्द मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत अशी टीका पटोले यांनी केली.  अटल सेतूबद्दल पटोलेंचे दावे महाराष्ट्र भाजपनं (Maharashtra BJP)  खोडून काढलेत. अटल सेतूला बदनाम करणं बंद करा, असे  महाराष्ट्र भाजपनं ट्वीट केले आहे.  


अटल सेतूला बदनाम करणं बंद करा. यांना निर्माण करणं जमलं नाही पण  बदनाम करण्यात यांचा ‘हात’ कोणी पकडू  शकत नाही. फोटोत दिसणाऱ्या  भेगा या अटल सेतूवरील नाही हे स्पष्ट दिसतंय. कारण या भेगा अटल सेतुकडे जाणाऱ्या जमिनीवरच्या रस्त्याला  पडल्या होत्या.  तातडीने दुरूस्तीचे  काम सुरू करून ते काम  सुद्धा पूर्ण होत आलं आहे, असे महाराष्ट्र भाजपनं आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.


अटल सेतूला तडे, नाना पटोलेंकडून पाहणी  


महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) 13 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. परंतु अवघ्या पाच महिन्यातच पुलाला तडे गेले आहेत.  अटल सेतू उलवे  मधून सुरू होतो त्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणामध्ये खचलेला  आहे. त्याची पाहणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  



अटल सेतूसंदर्भात MMRDA ने केलेला खुलासा


अटल सेतूचे प्रोजेक्ट हेड म्हणाले, अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या  जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका.  अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. सदर पोहाचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यान, उलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या असून त्या त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चा कंत्राटदार, मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.


हे ही वाचा :


अटल सेतू आजपासून खुला, 2 तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत, टोल किती? कोणत्या वाहनांना नो एंट्री? जाणून घ्या A टू Z माहिती