मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. युतीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Shivsena Dasara Meleva) उद्धव ठाकरे बोलत आहेत.


राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा, या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


शिवसेनेचा वचननामा जाहीर झाला नसला तरी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन उद्धव ठाकरेंनी काही महत्त्वाची आश्वासनंही आपल्या भाषणात दिली. शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलं.


तसेच राज्यातील नागरिकांना दहा रुपयात पूर्ण अन्न  उपलब्ध करुन देणार, रोगराई वाढतेय त्यामुळे एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा देणार, 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशी महत्त्वाची आश्वासनं उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा भगवा फडकणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.


अजित पवारांच्या राजीनामा नाट्याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत की आता राजकारणाचा स्तर खालावला आहे. त्यामुळे मी शेती करणार. शेती करणार मात्र धरणात पाणी नसेल तर काय करणार? अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.


VIDEO | उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यातील संपूर्ण भाषण


उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 




  • महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

  • एकाच महिन्यात दोन विजयादशमी. एक आजची आणि दुसरी 24 तारखेची.

  • राम मंदिराच्या जागी राम मंदिर व्हायलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

  •  विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही शिवसेनेची मागणी- उद्धव ठाकरे

  • अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा - उद्धव ठाकरे

  • आमचा कारभार  प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत- उद्धव ठाकरे

  • शिवसेना-भाजपची युती प्रामाणिक आहे - उद्धव ठाकरे

  • भाजपला पाठिंबा दिला नसता तर 370 कलम काढा सांगणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा? - उद्धव ठाकरे

  • अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले - उद्धव ठाकरे 

  • सुशीलकुमार म्हणतात की आघाडी थकलीय. वयामुळे नाही तर भ्रष्टाचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी थकली आहे - उद्धव ठाकरे

  • मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं, तसं धनगरांना आरक्षण द्या - उद्धव ठाकरे

  • देशावर प्रेम करणारे मुसलमान आमच्या सोबत आले, तर आम्ही त्यांचे सुद्धा न्यायहक्क मिळवून देऊ - उद्धव ठाकरे

  • पुन्हा सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार- उद्धव ठाकरे

  • राज्यात दहा रुपयांत पूर्ण अन्न देणार - उद्धव ठाकरे

  • रोगराई वाढतेय, एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार - उद्धव ठाकरे

  • ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी मोफत बस सेवा देणार- उद्धव ठाकरे

  •  300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार - उद्धव ठाकरे

  • जागा कमी पडल्या तरी, ताकद कमी पडू देऊ नका - उद्धव ठाकरे

  • ज्यांचं तिकीट कापलं, त्यांची माफी मागतो - उद्धव ठाकरे