मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रासह चित्रपटसृष्टीला हवाहवासा वाटणारा खोकल्याचा ठसका अर्थात 'वख्खा विख्खी वुख्खू' हे कसं सुचलं, याचा उलगडा दस्तुरखुद्द मराठी चित्रपटसृष्टीचे अमिताभ अर्थात अशोक सराफ यांनी केला.


'शेन्टिमेंटल' या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी 'माझा कट्टा'वर गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अशोकमामा नाव कसं पडलं, लक्ष्मीकांत बेर्डेसोबतचं ट्यूनिंग, निवेदिता सराफ यांच्यासोबतची ऑफस्क्रीन केमिस्ट्री यासह सर्व मुद्द्यांना स्पर्श केला.

यावेळी त्यांना 'वख्खा विख्खी वुख्खू' याबद्दलही विचारण्यात आलं.



अभिनयसम्राट अशोक सराफ यांच्या धूमधडाका या प्रचंड गाजलेल्या सिनेमातील हा तितकाच गाजलेला 'वख्खा विख्खी वुख्खू'चा ठसका.

मात्र हा ठसका स्क्रीपट्मध्ये अजिबात नव्हता. टाईमिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अशोकमामांनी त्या आयत्यावेळी समाविष्ट केलं.



त्याबाबत अशोक सराफ म्हणाले, "तोंडात स्मोकिंग पाईप घेऊन डायलॉग म्हणायचा होता. मात्र सिगरेट आणि पाईपमध्ये असलेला तंबाखूमध्ये फरक असतो. पाईपमधील तंबाखू खूपच तीव्र असतो. तो ओढल्यानंतर घशातून ठसका बाहेर येतो. ज्यावेळी संवाद बोलायचा होता, त्यावेळी मला ठसका आला आणि मी त्याच वेगात संवादही सादर केले. थोडं थांबून हे चांगलं होतंय असं कळल्यानंतर, तीच स्टाईल त्या सिनेमात पुढे कायम ठेवली. प्रेक्षकांनीही त्या स्टाईलला दाद देऊन ती अजरामर केली".

लक्ष्मीकांत बेर्डे

यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेच्याही आठवणी सांगितल्या. लक्ष्मीकांत बेर्डे हा जबरदस्त माणूस होता. सिनेसृष्टीची काहीही पार्श्वभूमी नसताना, त्याने सर्व काही संघर्ष करुन मिळवलं.



लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा फॉलोअर होता. टायमिंग कशी साधायची हे मला माहित होतं. आम्ही दोघांनी जवळपास 40-50 सिनेमे सोबत केले. त्यामुळे त्याने माझ्यासोबतचं ट्यूनिंग जमवून घेतलं. त्याचा हजरजबाबीपणा आणि टायमिंग हे जबरदस्त होतं. त्यामुळेच त्याची वेगळी छाप कायम राहिली, असं अशोक सराफ म्हणाले.

अशोक सराफचा अशोकमामा कसा झाला?

अशोक सराफ हे सिनेसृष्टीला अशोकमामा म्हणून परिचीत आहेत. मात्र त्यांना मामा म्हणायला कोणी सुरुवात केली, याबाबतही त्यांना विचारण्यात आलं.



ते म्हणाले, "मी एका सिनेमाच्या शुटिंगसाठी कोल्हापूरला होतो. तिथे प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो दररोज त्याच्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर यायचा. तिथे आल्यावर तो माझ्याकडे बोट करुन त्या मुलीला सांगायचा, हे कोण तर अशोकमामा. त्यामुलीपाठोपाठ स्वत: प्रकाशही मला अशोकमामा म्हणायला लागला. त्यावेळी सेटवर असलेल्या इतर क्रू मेंबर्सनाही मला काय म्हणायचं याची पंचाईत होती. ते थेट अशोक म्हणू शकत नव्हते, आणि अशोक साहेब हे शोभत नव्हतं. त्यामुळे त्यांनीही मला अशोकमामा म्हणायला सुरुवात केली आणि बघता बघता सगळीकडे मी अशोक मामा म्हणूच ओळखायला लागलो"

मात्र हे बरं आहे की माझा 'मामा' कोणी केला नाही, अशी हास्यकळी त्यांनी फुलवली.