मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना शिवसेनेला शिंगावर घेण्यासाठी कोकणची जबाबदारी हवी आहे. खरंतर त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असताना, त्यांनी कोकणची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. या बदलानंतर आशिष शेलार यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळात आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, आशिष शेलार यांनी स्वत: पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर 2019 साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आशिष शेलार यांनी पक्ष संघटनेत जबाबदारी मागितली आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेला शिंगावर घेतल्यावर कोकणची जबाबदारी शेलार यांना हवी आहे. भाजपची जास्त ताकद जशी विदर्भात दिसते, तशी शिवसेनेची ताकद कोकणात आहे. त्यामुळे मंत्रिपदाऐवजी मुंबईसह कोकणची जबाबदरी घेण्याची तयारी आशिष शेलार यांनी पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे.