मुंबई : बैलगाडा शर्यतींसमोरील मोठा अडसर दूर झाला आहे. प्राण्यांशी कौर्य प्रतिबंध विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाला असून, यानुसार प्राण्यांचे हाल केल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंड ठोठावला जाईल.


बैलगाडा शर्यती सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, बैलगाडा शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असेल. प्राण्यांसंदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. प्राण्यांना यातना होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल.

पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधेयक विधानसभेत मांडलं.

"बैलगाडा शर्यत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. स्पर्धेला गालबोट लागू नये म्हणून नियम असावा अशी सरकारची भूमिक होती. स्पर्धा नियमात राहून पार पडेल. बैलाचं संगोपन करणारे छोटे शेतकरी, मालक या सगळ्यांनाच आनंद झाला असेल.", अशी प्रतिक्रिया बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

बैलगाडा शर्यतींवर ग्रामीण भागातील मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे या विधेयकामुळे त्यांच्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. बैलगाडा शर्यतींचा अर्धा मोसम निघून गेला असला, तरी उरलेल्या काळाता बैलगाडा शर्यती होऊ शकतात.