मुंबई:  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा केली खरी, मात्र ही मागणी आपली असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.


मी आमदार म्हणून राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. तसेच तिला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आता भाजपच्या जाहीरनाम्यात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते टॅक्स घ्यायचा नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असं शेलार यांनी सांगितलं.

रस्ते टॅक्समधून महापालिकेला 500 ते 600 कोटी मिळतात, पण रस्त्यांची अवस्था तशीच असते. त्यामुळे महापालिकेच्या 'टॅक्स टेररिझम'मधून मुंबईकरांना सुटका मिळावी,ही आमची भूमिका आहे. यानंतर आता काही जणांना उपरती होत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

उद्धव ठाकरेंची घोषणा

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना पुन्हा श्रेयवादाची लढाई रंगलेली पहायला मिळतेय.

भाजपचा जाहीरनामा

मुंबईतील खड्डे दुरुस्त होईपर्यंत कोणताही रस्ते कर घेणार नाही,असे अनेक आश्वासन भाजपनं आपल्या जाहीरनाम्यातून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या महापालिका रस्ते टॅक्स आकारते. एकूण करापैकी साधारण 13 टक्के कर हा रस्ते टॅक्स मधून येतो. त्यामुळे जोपर्यंत रस्ते खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत रस्ते टॅक्स आकारणार नाही, असा भाजपचा मानस आहे.

तसेच जोपर्यंत मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी पट्टी आकाराली जाणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे.