'आधी माझ्याशी निपटा. जागा तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, मी चर्चेला येतो' अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याने कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत.
निवडणुका आल्या की यांना रोड शो सुचतात, लोकल ट्रेनने प्रवास करतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोवरही टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारणार?
एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि माझी जुगलबंदी होऊन जाऊ द्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीला परळमध्ये झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
'केंद्रीय आर्थिक पाहणीच्या अहवालात आमचं शहर पहिल्या क्रमांकावर आहे. हे आमचं मुंबई महापालिकेतील काम आहे आणि मग हा रिपोर्ट पाहा. मी हा रिपोर्ट बनवलेला नाही. हा अधिकृत आहे. सत्यमेव जयते. कशाला सत्याच्यापुढे अ लावून असत्यमेव जयते करताय. असत्य कधी जिंकणार नाही. तुमच्या थापा मुंबईकरांना पटणार नाहीच. मुंबईकरांसमोर एकाच व्यासपीठावर बोलूया, मी आणि मुख्यमंत्री जुगलबंदी होऊन जाऊ द्या. माझी तयारी आहे. जुगलबंदी कसली तर आम्ही केलेल्या कामांची. मी केलेल्या कामांपैकी एक तरी काम तुम्ही करुन दाखवा, माझं जाहीर आव्हान आहे.' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.