मुंबई : भाजप सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीनंतर शेलार बोलत होते. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. शेलार म्हणाले की, आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.


राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि इतर पक्षातील सुरू असलेल्या चर्चेवर आमचं लक्ष आहे, असेही शेलार म्हणाले. शेलार म्हणाले की, राज्यभरात 90 हजार बुथवर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधानपरिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले.

भाजपचं सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष : आशिष शेलार

आज प्रथमच भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर प्रथमच भाजपच्या कमळावर निवडून आलेल्या आमदारांसह भाजपचे सर्व आमदार आणि पाठिंबा दिलेले तसेच मित्रपक्षांचे आमदार देखील उपस्थित होते. आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, व्ही सतीश, विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांची बैठक ही बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच 'देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राजकीय सध्यस्थितीवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी चर्चा करणार असल्याचे शेलार यांनी बैठकीआधी सांगितले होते. संघटनात्मक अंतर्गत रचनात्मक बदलांबाबत आणि निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची देखील माहिती आहे.