Eknath Shinde : पक्षाविरोधात बंड पुकारलेल्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना एका बाजूने कडक संदेश आणि दुसऱ्या बाजूने मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. जवळपास 35 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी सुरतमधील हाॅटेल मेरेडियनमध्ये तळ ठोकला आहे. त्यांच्या दिमतीला गुजरात भाजपने तगडा बंदोबस्त दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक सुरतमध्ये पोहोचले.
तब्बल पाऊण तासांच्या प्रतीक्षेनंतर मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. भाजपशी सरकार स्थापन करावे, शिवसेनेनं भाजपशी युती केल्यास पक्षात राहू असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी बोलून आपली नाराजी स्पष्ट जाहीर केली. आमच्या भावना समजावून घ्या. महाविकास आघाडीमध्ये कोणताही समन्वय नाही. पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना विचारले जात नाही. पक्ष मुळ विचारधारेपासून भरकटला आहे. लोकांची नाराजी आहे, अशा शब्दात रश्मी ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे भावना व्यक्त केल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
रश्मी ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा केली. मागील 24 तासात मी एवढा वाईट झालो का ? अशीही विचारणा शिंदे यांनी केल्याची माहिती आहे. आपण कोणत्याही पक्षासोबत चर्चा केली नाही, कोणत्याही कागदावर सह्या केल्या नाहीत असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच एसंजय राऊत यांचीही तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या