मुंबई : सॅम डिसुझाला कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यानं अटकपूर्व जामीनासाठी केलेली याचिका फेटाळून लावत त्याला मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पंच साक्षीदार के.पी गोसावी आणि शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात कथितपणे दलाली करणाऱ्या सॅम डिसुझा या सल्लागारनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करण्यात येऊ नये, तसेच एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडेंप्रमाणे कारवाईच्या तीन दिवस आधी नोटीस बजावण्याची मागणीही डिसुझाकडून करण्यात आली होती. डिसुझाच्या या याचिकेवर बुधावारी रात्री हायकोर्टातील सुट्टीकालीन कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी याचिका ऐकताच ती फेटाळून लावली. ही याचिका फेटाळून लावताना याचिकाकर्त्यांना आधी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली त्यानंतर तब्बल 26 दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला. दरम्यान, आर्यन याला सोडण्यासाठी शाहरूखकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा गौप्यस्फोट याच प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल यानं एबीपी माझासमोर केला होता. किरण गोसावी आणि सॅम या दोघांत याबाबत बोलणं झाल्याचा दावाही प्रभाकरनं केला होता. त्यातच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीसह अन्य प्रकरणात अटक केल्यानंतर सॅम डिसुझानं एबीपी माझासमोर येत आणखीन मोठा गौप्यस्फोट केला.


एनसीबी अधिकारी आणि इतर खाजगी व्यक्तींविरोधात कथित खंडणीच्या तक्रारींच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं. सत्ताधारी सरकारमधील काही राजकीय नेत्यांनी पत्रकार परिषदांमध्ये आपलं नाव घेतलेलं आहे. आणि त्यामुळे अटक होण्याच्या भीतीपोटी डिसुझा यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.


डिसुझा यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं की, 1 ऑक्टोबर रोजी गोसावी यांनी त्यांना फोन केला आणि सांगितले की, ते अहमदाबादहून मुंबईला जात आहेत आणि 2 ऑक्टोबर रोजी मुंबईला पोहोचल्यावर गोसावी यांनी एनसीबी अधिकार्‍यांशी संपर्क साधल्याचंही सांगितलं. 2 ऑक्टोबर रोजी रात्री 8 च्या सुमारास, आपण ताज प्रेसिडेन्सी, फोर्ट इथं काही सहकाऱ्यांसोबत जेवायला गेलेलो असताना त्यादरम्यान सुनील पाटील यांचा फोन आला. त्यांच्याकडून कॉर्डेलिया क्रूझवर एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीला ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचं त्यांना सांगितलं आणि मला तपासण्याची आणि पडताळणी करण्याची विनंती केली. त्यानंतर डिसुझा यांनी 3 ऑक्टोबरला पूजा दादलानी आणि गोसावी यांच्यात एका मित्रामार्फत भेट घडवून आणली. दादलानी तिचा पती, गोसावी आणि डिसुझा यांच्यासह इतर काहीजण लोअर परळ इथं भेटले. त्यानंतर डिसुझा निघून गेला आणि नंतर गोसावीने आर्यनला मदत करण्यासाठी दादलानीकडून 50 लाख रुपये घेतल्याची माहिती मिळाली. 


त्यानंतर किरण गोसावीचा खोटेपणा आपल्या लक्षात आला. त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावानं सेव्ह होता. ट्रू कॉलरवर मला तसं दिसलं. त्यानंतर या कामासाठी जी 50 लाखांची रक्कम घेतली गेली होती ती गोसावीकडे परत मागितली. त्याने त्यातले 38 लाख परत दिले. प्रभाकरकडून 5 लाख आले. आणि बाकीची रक्कम माझ्या एका मित्राने दिली व 50 लाख रुपये शाहरुखच्या टीमकडे परत केल्याचा दावा सॅमने केला आहे. के.पी. गोसावी हा समीर वानखेडे यांच्या नावाचा गैरवापर करत असून वानखेडेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असंही सॅमनं आपल्या याचिकेत नमूद केलं होतं.


महत्वाच्या बातम्या :