प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून इनामदार यांची ओळख होती. अरविंद इनामदार यांनी नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. त्यांच्या नेतृत्त्वात पोलिस दलात अनेक विद्यार्थी घडले. अरविंद इनामदार यांनी गाजलेलं जळगाव सेक्स स्कॅण्डलचं प्रकरण यशस्वीपणे हाताळलं होतं. त्यांनी नेहमीच पोलिस खात्यातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचंही त्यांनी मुलाखतींमधून सांगितलं आहे.
फक्त पोलिस महासंचालक म्हणून इनामदार यांची कारकीर्द गाजली नाही तर साहित्य वर्तुळातही त्यांचा वावर होता. पोलीस लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते. खुसखुशीत भाषा शैली आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत. आपल्यावर भगवद्गीताचा मोठा प्रभाव असल्याचे अरविंद इनामदार कायम सांगायचे. आईने चौथ्या वर्षी आईने हातात भगवद्गीता दिल्याची आठवण इनामदारांनी 'माझा कट्टा'वर सांगितली.
अरविंद इनामदार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर गावात झाला होता. अरविंद इनामदार 1 ऑक्टोबर 1997 ते 5 जानेवारी 2000 या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.