मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. जर आज (8 नोव्हेंबर) काही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री सरकारी गाड्या आणि इतर सुविधा परत करु शकतात. शिवसेना आणि भाजपमधील संवाद सध्या पूर्णत: बंद आहे, परिणामी सत्ता स्थापनेबाबत कोणताही तोडगा निघत नाही.


तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. तेरावी विधानसभा ही 10 नोव्हेंबर 2014 रोजी अस्तित्त्वात आली होती. 9 नोव्हेंबर रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने विधानसभेचा कार्यकाळ हा संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदीनुसार त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. सरकारचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही तासच शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत कालावधीत जर नवे सरकार अस्तित्वात आले नाही तर, घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे एक तांत्रिक बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात.

अजूनही सत्ता स्थापनेचा दावा नाही
विधानसभा निवडणुकीत 105 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, त्या खालोखाल शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मोठा पक्ष म्हणून सरकार बनवण्याची नैतिक जबाबदारी भाजपवर येते. विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना महायुतीत तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत लढले होते. संख्याबळाचा विचार करता भाजप-शिवसेनाने युतीचं सरकार स्थापन करायला हवं होतं. परंतु मुख्यमंत्रीपद आणि सत्तावाटपावरुन दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाल्यामुळे कोणीही राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नाही. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचं मॅनडेट दिलं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या अस्थिर परिस्थिती निर्माण झाली असून, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल झाली आहे. आज भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला नाही तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

भाजप नेते राज्यपालांना भेटले
याआधी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने काल (7 नोव्हेंबर) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, जनतेने भाजप-शिवसेना 'महायुती'ला बहुमत दिलं आहे. सरकार स्थापनेला उशीर होत आहे, आतापर्यंत सरकार स्थापन व्हायला हवं होतं. आम्ही राज्यात कायदेशीर पर्याय आणि राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्यपालांना भेटलो. भाजप हायकमांडसोबत चर्चा करुन पुढील रणनीती निश्चित करु.

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर कायम
दुसरीकडे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची 'मातोश्री'वर बैठक झाली. मला युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा. जे ठरलंय तसं व्हावं,  त्यापेक्षा एक कणही जास्त मला नको, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचा इशारा दिला. बैठकीनंतर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, "आम्ही पुढील दोन दिवस हॉटेलमध्ये राहणार आहोत. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं."