मुंबई : नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयावर आज भर दिवसा सशस्त्र दारोडा पडला आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. या दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बंधक करुन, एक कोटी 75 लाख किंमतीचं सोनं लुटून नेलं आहे.


सोनं पळवून नेताना या दरोडेखोरांनी चारचाकी गाडी मध्येच सोडली आणि हे चोरटे दुचाकी वाहनांद्वारे फरार झाले. या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे, पोलीस त्याद्वारे दरोडेखोरांचा तपास करत आहेत.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर सेन्ट्रल पार्क या मुख्य रस्त्यावर युनायटेड पेट्रो फायनान्स कंपनीचं, गोल्ड लोनचं कार्यालय आहे. येथे सोनं गहाण ठेवून त्यावर कर्ज दिलं जातं. तसेच येथे लॉकर सुविधाही आहे.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास 6 सशस्त्र दरोडेखोर लाल रंगाच्या तवेरा गाडीने आले. दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता, मंकी कॅपही घातली होती. या दरोडेखोरांनी कार्यालयात घुसून पहिल्यांदा कार्यालयातील कर्माच्याऱ्यावर तलवार, चाकू आणि पिस्तूल रोखले. कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून ठेवले आणि त्यानंतर कार्यालयातील 234 लॉकर्समधील सोनं दोन थैल्यांमधून भरुन नेलं. एक कोटी 75 लाख 41 हजार रुपये किंमतीचं 4.659 किलो वजनाचं सोनं घेऊन अवघ्या 15 मिनिटात हे दरोडेखोर फरार झाले.

ज्या गाडीतून दरोडेखोर आले होते ती गाडी विरार पूर्वेकडील मोहक सिटी परिसरात सोडून, तेथून बाईकने हे दरोडेखोर पळाले. पोलिसांनी गाडी आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.