Mamata Banerjee: राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जानेवारी रोजी कोर्ट आपला निकाल देणार आहे. याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावण्याच्या निर्णयाला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्यावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद मंगळवारी पूर्ण झाल्यानं विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपला निकाल राखून ठेवला आहे.


मुंबई दौ-यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्येच निघून जात राष्ट्रगीतचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं 2 मार्च 2022 रोजी ममता बॅनर्जी यांना सुनावणीकरता न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी जेष्ठ कायदेतज्ज्ञ माजिद मेमन यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे.


ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) राज्यात शासकिय अतिथी म्हणून आल्या होत्या की, तो त्यांचा खासगी दौरा होता?, अशी विचारणा करत न्यायालयानं राज्य सरकारला करत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मागील सुनावणी दरम्यान दिले होते. त्यानुसार, आगामी 2024 च्या निवडणूकांसाठी भाजपविरोधी राजकीय पक्षांसोबतच्या बैठकीला त्याही उपस्थित होत्या. म्हणजेच ममतांची मुंबई भेट ही शासकीयच होती. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी शासकीय शिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) पालन करणं आवश्यक होतं, अशी भूमिका राज्य सरकारनं न्यायालयात मांडली आहे.


काय आहे प्रकरण 


मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काहीकाळ त्या उभ्या राहिल्या आणि पुढे राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून थेट निघून गेल्या. ही क्लिप सोशल मीडियावर पाहिल्यानंतर भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. बॅनर्जींचं हे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून 1971 राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला आहे. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. तूर्तास सत्र न्यायालयानं दंडाधिकारी न्यायालयाच्या कारवाईला दिलेली स्थगित कायम ठेवली आहे.