मुंबई: 10 रुपये किलोनं रद्दी विकण्यासाठी दहावीच्या बोर्डाचे पेपर चोरल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली आहे. दोन दिवसांआधी मुंबईतल्या दहिसरच्या इस्रा विद्यालयातून दहावीच्या बोर्डाचे 516 पेपर चोरीला गेले होते. यापैकी 330 पेपर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यात 181 पेपर इतिहास तर 149 पेपर विज्ञान विषयाचे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
हरीश शर्मा आणि अकीब शेख अशी आरोपींची नावं असून दोघे जण अल्पवयीन आहेत. हे सर्व आरोपी शाळेच्या परिसरातच राहतात. मात्र 516 पैकी सध्या 330 पेपरच पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळं इतर पेपरचं चोरट्यांनी काय केलं? याची चौकशी सुरु आहे.
दहिसरमधील इस्रा शाळेकडे बोर्डाने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाठवल्या होत्या. या उत्तरपत्रिका मुख्याध्यापक नरेंद्र पाठक यांच्या कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या.
मात्र, तीन एप्रिल रोजी काही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची बाब शाळेच्या निदर्शनास आली. या उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची शक्यता वर्तवत शाळा प्रशासनाने पाच दिवसांनी पोलिसांत धाव घेत घेतली. शाळेने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेतल्याने चोरी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन चौघांना अटक करण्यात यश मिळवलं.
संबंधित बातम्या:
मुंबईत दहिसरमधील शाळेतून दहावीच्या 516 उत्तरपत्रिका चोरीला