मुंबई: तृतीयपंथीयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या मंत्रालयातील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं. गेल्या तीन वर्षापासून राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी महामंडळाची स्थापना केली नसल्यानं थेट पंकजा मुंडे यांचे कार्यालय गाठत तृतीयपंथीयांनी तिथे निदर्शने केली.


काँग्रेस सरकारने या संबंधीचा जीआर पास केल्यानंतरही भाजप सरकारने महामंडळ बनवलं नसल्याने ततृतीयपंथीयांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. असं दावा आंदोलक तृतीयपंथीयांनी केला.

गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही मदत होत नसल्याने आज त्रस्त झालेल्या तृतीयपंथीयांनी मंत्रालयातील कार्यालयात निदर्शने केली.

...तर ‘सबका साथ, सबका विकास’ कसा?: लक्ष्मी त्रिपाठी

'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आम्हाला आमचे हक्क मिळून ३ वर्ष झाली.  गेल्या तीन वर्षापासून राज्य सरकारने तृतीयपंथीयांसाठी महामंडळाची स्थापना केलेली नाही.  आमच्यासाठी असलेल्या फंड महिला व बालविकास खात्याकडे आहे. अजूनही आमच्यासाठी कमिटीही स्थापन करण्यात आलेली नाही. आम्ही मोठी व्होट बॅंक नसल्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आम्हाला मुलभूत अधिकार मिळत नाही. जर असं असेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ कसा?’ असा सवाल आंदोलक तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठींनी केला आहे.