मुंबई : "तिथीचा हट्ट सोडा, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीची तारीख जाहीर करा," असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आले आहे.  हे आवाहन दुसरं तिसरं कोणी नाही तर महाराष्ट्र विकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र शिवसेनेची तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची परंपरा असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यात छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा वाद काही नवा नाही. यापूर्वीही अनेकदा राजकीय पक्ष, शिवप्रेमी, साहित्यिक आणि इतिहास संशोधक शिवजयंतीच्या तिथीच्या वादावरुन आमनेसामने आले आहेत. मात्र यंदाची शिवजयंती बदलेल्या राजकीय समीकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेचा किंबहुना वादाचा मुद्दा ठरु शकते. याचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आता 'तिथीचा हट्ट सोडा' असं ट्विटरच्या माध्यमातून जाहीर आवाहन केलं आहे. तर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही शासनाच्या तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे.


मागच्या शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काळातही शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर आग्रही होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांकडून तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र शासनाने शासकीय शिवजयंती साजरी केली तरी शिवसेना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते.

आता मात्र शिवसेनेच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची यंदा पहिलीच शिवजयंती साजरी होणार आहे. छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या सर्व पक्षांसमोर या जयंतीच्या निमित्ताने एका नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात असलेला भाजपही आता शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादावर काय तोडगा काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.