मुंबई : टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. अण्णा हजारेंच्या जीवनावर आधारित 'अण्णा' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. त्यानिमित्ताने अण्णांनी 'माझा कट्टा'वर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.

अण्णा म्हणाले की, "टीम अण्णा फुटली नसती तर देशाचं चित्र बदललं असतं. काहींनी टीम अण्णा फोडण्याचा प्रयत्न केला तर आमिषाला बळी पडून काही फुटले. देशाच्या सरकारमध्ये परिवर्तन करण्याची ताकद टीम अण्णामध्ये होती. जनशक्तिच्या दबावामुळे सरकारला काही निर्णय घेणं भाग पाडलं असतं. टीम अण्णावर लोकांचा विश्वास होता."

'टीम अण्णामधील संवाद नाही'

मात्र पुन्हा टीम अण्णा तयार होऊ शकणार नाही, असंही यावेळी अण्णा हजारे म्हणाले. टीम अण्णामधील सदस्यांशी आता संवाद राहिलेला नाही. ते संवादाच्या पलिकडे गेलं आहे. कारण सत्तेची नशा चढली की ती उतरत नाही, असा म्हणत अण्णांनी व्ही के सिंह, किरण बेदी यांना टोला लगावला.

'अण्णांचा मोदींना टोला'

अण्णांमुळे केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलं. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे मनमोहन सरकारविरोधी वातावरण निर्माण झालं आणि त्याचा फायदा मोदी लाटेला झाला, असं म्हटलं जात, याबाबत काय वाटतं असं अण्णांना विचारलं. यावर अण्णा म्हणाले की, "मोदी ते मानत नाहीत. जर ते असं बोलले तर त्यांची व्हॅल्यू कमी होईल."

'केजरीवाल सरकारला मार्क देणं अवघड'

अरविंद केजरीवालांबद्दल विचारलं असता अण्णा म्हणाले की, "राजकीय पक्ष स्थापन करण्यापूर्वी मी अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारला होता. पक्षातील लोक जीवन निष्कलंक, शुद्धा आचार-विचार असलेले आहेत की नाही, हे तपासलं का? ते तपासलं नाही म्हणून तीन मंत्री गेले. मुख्यमंत्री बनून तीन मंत्री घरी गेले तर काय उपयोग? सत्तेची नशा चढली की उतरत नाही." तसंच केजरीवाल सरकारला 10 पैकी किती मार्क, याचं उत्तर अवघड असल्याचंही अण्णा हजारेंनी सांगितलं.