मुंबई : देशातील सर्वात मोठ्या ग्राऊंड स्टाफ हँडलिंग पुरवणाऱ्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. याप्रकरणी शासन दरबारी न्याय मिळत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'मातोश्री'चे दरवाजे ठोठावले आहेत.
यासंदर्भात दमानिया यांची 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंसोबत बैठक पार पडली. त्याआधी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद झाला. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली. खंबाटा कंपनीचे कर्मचारी आणि जीव्हीके तसंच बर्डस कंपनीच्या पदाधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
शनिवारपर्यंत बर्ड्स कंपनी त्यांच्या मालमत्तेचं मूल्यमापन करून किती पैसे देय आहेत, हे शनिवारपर्यंत कळवणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या कोट्यावधींच्या वेतन निधीत गैरव्यवहार केल्याचा थेट आरोप अंजली दमानिया यांनी उद्धव ठाकरेंकडे केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही कामगारांच्या देय रकमा त्वरित देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत. त्यामुळं या मुद्द्यावरुनही भाजप-शिवसेनेत राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या श्रेय वादावर मला काही बोलायच नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.