Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला देण्यात आली आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी झालेल्या अटकेनंतर सध्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या देशमुखांचा नव्यानं जबाब नोंदविण्यासाठी सीबीआयला मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता, ज्याला मंगळवारी कोर्टानं परवानगी दिली आहे. त्यानुसार आता 3, 4 आणि 5 मार्च असे सलग तीन दिवस सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड कारागृहात जाऊन देशमुखांची चौकशी करणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जेव्हा सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी दिल्लीहून आलेल्या पथकानं जोगेश्वरी येथील विश्रामगृहात अनिल देशमुखांची चौकशी केली होती. त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात 13 तास चौकशी केल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशी सुरू करत देशमुखांना अटक करत त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्यातच आता सीबीआयला पुन्हा एकदा अनिल देशमुखांची नव्यान चौकशी करायची असून त्यासाठी त्यांनी रितसर मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज सत्र न्यायालयाने स्वीकारत सीबीआयला देशमुखांची चौकशी करण्यास परवानगी दिली आहे.
दुसरीकडे, मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावरील दोन्ही पक्षकारांकडून युक्तिवाद हा पूर्ण झाला असून न्यायालय देशमुखांच्या भवितव्याचा फैसला 9 मार्चला जाहीर करणार आहे. त्यामुळे आता देशमुखांना नव्या अडचणीला सामोरे जावे लागते का? की सुटका होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा
- चांदिवाल आयोगाच्या कारभाराविरोधात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घ्या, मुंबई उच्च न्यायालयाची सचिन वाझेला तंबी
- Russia Ukraine War: कोल्हापूर-पोलंडचा असाही ऋणानुबंध; दुसऱ्या महायुद्धात पाच हजार पोलंडवासीय कोल्हापूरच्या आश्रयाला
- Nawab Malik: नवाब मलिकांच्या ईडी विरोधातील याचिकेवर बुधवारी तातडीची सुनावणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha